निवडणूक प्रक्रिया व मतदान कामासाठी कर्मचार्यांची गैरसोय टाळावी : दादासाहेब लाड
– पुणे व कोल्हापूर जिल्हा शिक्षक भारतीच्यावतीने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
बिद्री / कोल्हापूर
टी. एम. सरदेसाई
व्हिजन मराठी न्यूज
सर्वच निवडणूक कामासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आतापर्यंत प्रामणिकपणे काम करीत आलेले आहेत. सध्या होवू घातलेल्या विधानसभा निवडणूक कामासाठी जिल्ह्यातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दूरच्या ठिकाणी निवडणूक कामासाठी नियुक्ती आदेश मिळाले आहेत. हे नियुक्त आदेश अनेकजणांच्या गैरसोयीचे आहेत. खरे तर कर्मचारी ज्या मतदार संघात रहिवाशी आहेत त्या मतदार संघात अथवा नजिकच्या मतदार संघात नियुक्ती आदेश देण्यात आल्यास कर्मचाऱ्यांच्या सोयीचे होईल. असे निवेदन शिक्षक भारती पुणे विभागाच्यावतीने अध्यक्ष दादासाहेब लाड यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहे.
याबाबत बोलताना दादासाहेब लाड म्हणाले,
कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
परंतु निवडणूक कामासाठी अनेक कर्मचाऱ्यांना सुमारे १०० ते १५० कि.मी. अंतरावर नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत. प्रशिक्षणासाठी सकाळी ९ वाजता तेथे पोहचणे हे अडचणीचे ठरणार आहे. तसेच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान साहित्य ज्या त्या तालुक्याचे ठिकाणी जमा करणेस रात्री खूप उशिरा होतो. अशावेळी रात्रीचा परतीचा प्रवास करणे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीचे तसेच धोकादायकही ठरणार आहे. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे अशा रस्त्यावरून मध्यरात्रीच्या वेळी प्रवास करणे, वहातुकीची असुविधा यामुळे कर्मचाऱ्यांना अत्यंत धोकादायक ठरू शकते. या सर्वांचा विचार करून शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्यांच्या नजिकच्या मतदार संघामध्ये नियुक्ती द्यावी. निवेदनाचा विचार करून दुसऱ्या प्रशिक्षणापूर्वी योग्य बदल करावा. अशी मागणी पुणे विभाग शिक्षक भारतीच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी शिक्षक पुणे विभाग शिक्षक भारतीचे अध्यक्ष दादासाहेब लाड, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र रानमाळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष काकासाहेब भोकरे व पदाधिकारी उपस्थित होते.
– – – – – – – – –
प्रशासनाने विश्वास दाखवावा !
अनेक वर्षे शिक्षण विभागातील कर्मचारी सर्वच निवडणूकीचे काम जबाबदारीने व विश्वासपूर्वक करीत असतात. तरी अलीकडेच्या अनुभवावरून निवडणूक कामासाठी तालुका बदल तसेच लांबचे ठिकाणी निवडणूक कामासाठी नियुक्ती केली जात आहे. यातील अनेक शिक्षक व कर्मचारी सेवानिवृतीकडे झुकलेले किंवा शारीरिक व्याधी असते. त्यामुळे निवडणूक कामाचे ठिकाण जवळचे व सोयीचे करून प्रशासनाने विश्वास दाखवावा. अशी विंनती पत्रकारांशी बोलताना दादासाहेब लाड यांनी केली.
– – – – – — – – – – – –