सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी हिमालयासारखा उभा आहे : मंत्री मुश्रीफ
बिद्री / बामणी
टी. एम. सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यूज)
सैनिकहो, तुमचे अपार कष्ट, त्याग आणि बलिदानामुळेच आपला भारत देश सुरक्षित आहे. भारत मातेच्या संरक्षणासाठी निधड्या छातीने लढणाऱ्या सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी हिमालयासारखा उभा आहे. अशी भावना वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी सैनिकांच्या स्नेहमेळाव्यात पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल विलास सुळकूडे होते.
मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवाची बाजी लावून भारतमातेच्या संरक्षणासाठी बलिदान देत सैनिक देशाचे रक्षण करीत भारत देश या जवानांमुळेच सुरक्षित आहे.
ज्यावेळी सैनिक भारतमातेच्या संरक्षणासाठी कर्तव्यावर असतात. त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे, त्यांची काळजी करणं आणि त्यांच्या अडी-अडचणी सोडविणे ही सर्वांचीच सामाजिक जबाबदारी आहे. समाजाने केलेली ही सुद्धा एक देशसेवाच ठरेल. सैनिकांचे समाजावरील हे ऋण कुणीही विसरू नयेत. जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे उपाध्यक्ष कर्नल विलास सुळकुडे यांच्या माध्यमातून सैनिकांच्या अडीअडचणी सुटतील.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, ऊन -वारा -पाऊस याची तमा न बाळगता सैनिक हा कायमपणाने मागे न हटता देशासाठी लढत राहतो. देशावर कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर त्या ठिकाणी भारतीय सेना सर्वात पुढे असते. आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये सैनिकांचे मोठे योगदान आहे.
कर्नल विलास सुळकुडे म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकसंघ करून एक चांगले व्यासपीठ निर्माण केले आहे. आम्ही देशासाठी केलेल्या कष्टाचा सन्मान केल्यामुळे धन्यता वाटते. जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या उपाध्यक्षपदी माझी निवड केली आहे. या माध्यमातून तमाम सैनिकांचे असणारे प्रश्न समस्या सोडवण्यास मदत होणार आहे.
गोकुळचे संचालक अबंरिषसिंह घाटगे म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी सैनिकांचा मालमत्ता कर माफ केला आहे. शहिद जवानांची स्मारके उभारली, गावागावात सैनिक भवन, माजी सैनिकांच्या नावाने गावोगावची प्रवेशद्वारे ही सर्वच विकासकामे अतुलनीय अशीच आहेत. यामुळे मतदार संघातील सर्वच आजी-माजी सैनिक मंत्री मुश्रीफ यांच्या पाठीशी राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ आणि आजी-माजी जवान यांचे ऋणानुबंधाचे नाते आहे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडवण्यात श्री. मुश्रीफ नेहमीच अग्रभागी राहिले आहेत.
यावेळी माजी सैनिक केरबा पाटील, बाबुराव नरके, बाजीराव जाधव, अनिल आरागडे, लक्ष्मण पाटील, मस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आजी – माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष प्रविण काळबर यांनी केले.
किमान अपमान तरी करू नका !
गोकुळचे संचालक अमरीश घाटगे म्हणाले, दोन दिवसापूर्वी समरजीत घाटगे यांनी व्हनाळी येथे येऊन भाषणात माझे आजोबा मेजर आनंदराव घाटगे यांचा उल्लेख “कॅप्टन” असा केला. माझे आजोबा तर मेजर या उच्चपदावर होते, मात्र समरजीत घाटगेंनी त्यांचा उल्लेख कॅप्टन असा करून अपमान केला आहे. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना
मान देता येत नसेल, तर किमान त्यांचा अपमान तरी करू नका. असा टोला लगावला.
— —