राधानगरीच्या उमेदवारीसाठी के. पी. पाटील यांची ‘मातोश्री’ वर धडक
– ‘महाविकास ‘ तून उमेदवारीसाठी मेव्हण्या-पाहुण्यात चुरस वाढली !
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
(व्हिजन मराठी न्यूज)
कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडीना वेग आला आहे. सर्वाचे लक्ष लागून राहिलेल्या राधानगरी – भुदरगड मतदार संघात माजी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळविण्यासाठी मेव्हण्या-पाहुण्यात चुरस वाढली आहे. महाविकास आघाडीतून ए. वाय. पाटील राधागरीत मेळावे घेवून जोरदार मोर्चेबांधणी करीत आहेत. तर ‘बिद्री’ चे अध्यक्ष व माजी आमदार के. पी.पाटील हे थेट मुंबईत मातोश्रीवर धडक देत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून बैठक झाली आहे. त्यामुळे मेव्हण्या- पाहुण्यात उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे.
या मतदारसंघाचे प्रकाश आबिटकर हे विद्यमान आमदार आहेत. महायुतीमधून त्यांची उमेदवारी निश्चित आहे.महाविकास आघाडीत मात्र उमेदवारीसाठी घडामोडीना वेग आला आहे . महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसकडे आहे ती बदलून शिवसेना ठाकरे गटाकडे जाणार आहे ? या बदलाच्या राजकारणात आपल्यास संधी मिळावी म्हणून के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्यात चुरस आहे. उध्दव ठाकरे यांची के. पी. पाटील दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. अद्याप निर्णय झाला नाही. तथापि आज मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत या बाबत काही निर्णय अपेक्षित आहे. जिल्ह्यातील इतर जागेसाठीही या बैठकीत बरीच खलबते होण्याची दाट शक्यता आहे. मातब्बर नेतेही मुंबईत ठाण मांडून आहेत.
दरम्यान, बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरबरोबर राधानगरी, भुदरगडमध्ये विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रमांचे आयोजन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. महायुतीच्या यशासाठी आमदार आबिटकर यांनी ही विविध विकास कामांचा धडाका लावला असून पुन्हा एकदा निवडणूकीस सामोरे जात आहेत.
— — –