विश्वजीत मोरेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड
सरवडे : युवराज पाटील ( व्हिजन मराठी न्यूज प्रतिनिधी)
राधानगरी तालुक्यातील सरवडेचा मल्ल विश्वजीत मोरे याची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड ही गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरली आहे. 55 किलो वजनी गटातील अप्रतिम कामगिरीमुळे, विश्वजीतने केवळ आपल्या कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण सरवडे गावाचे नाव उंचावले आहे. यापूर्वी आशियाई कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी करत त्याने भारतासाठी रौप्य पदक जिंकले होते, ज्यातून त्याच्या प्रतिभेची झलक साऱ्यांनी पाहिली.
अथक परिश्रमांचा पाया !
लहान वयातच कुस्तीच्या रिंगणात उतरलेल्या विश्वजीतने कष्ट, शिस्त, आणि चिकाटीच्या जोरावर मोठ्या स्पर्धांमध्ये चमक दाखवली आहे. त्याचे प्रशिक्षक आणि गावकरी नेहमी त्याच्या जिद्दीला सलाम करतात. त्याच्या मागे उभा राहिलेला त्याचा परिवार, गुरू, आणि सरवडे गावाचे आशीर्वाद त्याला यशाच्या शिखरावर घेऊन जात आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा !
आता जागतिक कुस्ती स्पर्धा ही विश्वजीतसाठी एक मोठी संधी आहे. या स्पर्धेत तो आपला सर्वोच्च प्रदर्शन करेल, याची खात्री त्याचे प्रशिक्षक आणि समर्थकांना आहे. जागतिक स्तरावर भारतीय कुस्तीचा झेंडा रोवण्यासाठी विश्वजीत मोरेची आक्रमक शैली आणि बुद्धिमत्तेने सज्ज तयारी सुरू आहे.
— — –