शाखाधिकारी विजय कदम यांचा ‘उत्कृष्ट कार्याबद्दल ‘गोकुळ’ मार्फत सत्कार
बिद्री : प्रतिनिधी
गोकूळ दूध संघाच्या बोरवडे ( ता. कागल ) येथील शाखेवर उत्कृष्ट आयुर्वेदिक बगीचा निर्मिती व पूर परिस्थितीमध्ये शाखेची क्षमता कमी असूनही इतर शाखांकडून येणारे अतिरिक्त सर्व दुध स्वीकारले. या उत्कृष्ट कार्याबद्दल शाखाप्रमुख विजय मारुती कदम यांचा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शाखाधिकारी विजय कदम यांच्या प्रयत्नांतून उभारलेल्या या आयुर्वेदिक बगीच्यामध्ये ६३ आयर्वेदिक रोपांचा समावेश असून यांचा उपयोग गाय, म्हैस या जनावरांच्या औषधासाठी केला जातो. यामध्ये प्रामुख्याने कोरफड, हाडजोड, शतावरी, अश्वगंधा, वोवा, तुळशीचे वेगवेगळे प्रकार, लाजरी, कडुलिंब, बेल, अडुळसा, फागळा, म्हाळुंग,वेखंड या औषधी वनस्पतींचा समावेश आहे.
नुकत्याच येऊन गेलेल्या महापूरावेळी जिल्ह्यातील अनेक मार्गांवर पाणी आल्याने गोकूळच्या दूध संकलनावर परिणाम झाला होता. यावेळी अन्य शाखांकडे जाणारे दूध गोकूळच्या बोरवडे शाखेला जमा करण्यास सांगितले होते. शाखेची क्षमता कमी असूनही इतर शाखांकडून येणारे अतिरिक्त सर्व दुध स्वीकारण्याचे आव्हान शाखाधिकारी कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्विपणे पेलले.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, माजी चेअरमन विश्वास पाटील, सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह दुध संस्थांचे पदाधिकारी व उत्पादक उपस्थित होते. — –