आगामी विधानसभेला उपरा उमेदवार नको
-आदमापूर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एकमुखी मागणी
कूर : (व्हिजन प्रतिनिधी)
आगामी विधानसभा निवडणूकीत राधानगरी मतदारसंघातून महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यालाच संधी द्यावी व आयात केलेला उसना उमेदवार जनतेच्या माथी मारु नका. अशी एकमुखी मागणी आदमापूर (ता.भुदरगड) येथे राधानगरी-भुदरगड व आजरा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यात करण्यात आली.
यावेळी जेष्ठ नेते मुकुंद देसाई यांनी आजरेकरांना आवर्जून निमंत्रण देऊन विचारात घेतल्याबद्दल महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे आभार मानत तुम्ही घ्याल तो निर्णय व वरिष्ठ नेते देतील तो आदेश पाळूया आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणूया असा निर्धार व्यक्त केला
यावेळी गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे म्हणाले, गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचा वापर करून घेऊन अनेक लोक आमदार झालेत आमदार झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस कसे संपवता येईल हेच काम केल्याचा घणाघाती आरोप केला.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणूकित महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी प्रामाणिकपणे काम केल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले. हीच एकजूट भविष्यात महाविकास आघाडीने ठेवली तर महाविकास आघाडीचा निष्ठावंत कार्यकर्ताच येथून आमदार होईल. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाला हा मतदारसंघ मिळाल्यानंतर आपणच लढवण्यास इच्छुक असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली.
‘गोकुळ ‘ चे संचालक आर. के. मोरे म्हणाले, काँग्रेस पक्षाची निर्णायक ताकद राधानगरी विधानसभा मतदारसंघात आहे. प्रत्येक गावागावांमध्ये काँग्रेस आहे. माझ्या नावावर राधानगरी तालुका काँग्रेसमध्ये एकमत केले असून मी लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.
जि. प. माजी सदस्य जीवन पाटील म्हणाले, सतेज पाटील देतील तो आदेश मान्य आहे. परंतु उमेदवार हा काँग्रेस राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे गटाचा असावा आणि तो काम करणारा प्रामाणिक व निष्ठावंत असावा. विधानसभा निवडणुक आपण लढवली असून आपणही इच्छुक असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी सचिन घोरपडे म्हणाले, अनेक वर्षे काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय पण काही लोक आम्हाला गृहीत धरून आमचा वापर करून घेत असतील तर काँग्रेसचं असित्व काय आहे? असं जर कोणी उपरा उमेदवार देणार असतील तर ते खपवून घेतलं जाणार नाही.
सत्यजित जाधव म्हणाले, काँग्रेस कार्यकर्त्यानी एकसंघपणे काम केलं तर हा मतदारसंघ जिकणे अवघड नाही. राष्ट्रवादीचे संतोष मेंगाने म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत उपरा आणि उसना चालणार नाही असे आपण स्वतः शरद पवार यांना कळविले असून ते बंडखोरांना घेणारच नाहीत असा शब्द दिला आहे. राधानगरीचे शिवसेनेचे प्रमुख सुरेश चौगुले यांनी देखील महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला व आपणही इच्छुक आहे अशी भावना व्यक्त केली.
श्रमिक मुक्ती दलाचे संपत देसाई म्हणाले, भाजप व बंडखोर सरकार हे लोकशाहीचा खून करत असून प्रत्येकाने महाविकास आघाडी देईल तो आदेश पाळूया आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचा पुन्हा एकदा आमदार करूया. कॉम्रेड सम्राट मोरे म्हणाले, गेल्या अनेक वर्षे आम्ही छोटे- छोटे पक्ष आंदोलने चळवळी करत असून देशामध्ये आणि राज्यांमध्ये चाललेलं भारतीय जनता पार्टीचे सरकार हे घातकी असून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत आहे. यासाठी या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यास सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल.
यावेळी के. के. कांबळे, जनता दलाचे विनोद मुसळे, आजऱ्याचे नेते उदय पवार, रणजित देसाई, गोकुळ चे माजी संचालक दिनकर कांबळे, राधानगरीचे सुशील कुमार पाटील, वैभव तहसीलदार, रवी पाटील, बिद्रीचे संचालक डी. एस. पाटील, शरद पाडळकर, माजी जि.प. सदस्य एस. एम. पाटील, बाबुल देसाई, नितीन बोटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, तालुका संघाचे संचालक शहाजी देसाई , शरद पवार गटाचे धनराज चव्हाण, अजित पाटील, चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील, ओबीसी सेल चे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गुरव, संजय सरदेसाई, अमर बरकाळे व महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
—