आ. आबिटकर यांच्यामुळे अखेर टिक्केवाडी रस्त्याचा १४ वर्षांचा वनवास संपला !
– रस्त्यासाठी ६ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूरः रस्ता दर्जेदार व अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी.
कूर : (व्हिजन प्रतिनिधी)
भुदरगड तालुक्यातील कूर-नाधवडे-टिक्केवाडी या प्रचंड दूरावस्था झालेल्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आमदार प्रकाश आबिटकर यांनी तब्बल ६ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर करुन आणला आहे. २०१० नंतर प्रथमच या रस्त्याची दुरुस्ती होत असून अखेर गेली १४ वर्षे दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या या रस्त्याचा वनवास संपल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र या रस्त्याचे काम दर्जेदार व रुंदीकरणासह अतिक्रमणमुक्त करावे अशी मागणी जनतेतून होत आहे.
कूर पंचक्रोशीला जोडणाऱ्या या मुख्य व अत्यंत महत्वाच्या रस्त्यावर अक्षरश: फुटा-फुटाच्या अंतरावर पडलेल्या मोठ- मोठ्या खड्यांतून रस्ता शोधण्याची वेळ नागरिकांवर वेळ आली आहे.तालुक्यातील प्रत्येक गाव आणि वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांसाठी शासन व लोकप्रतिनिधीकडून करोडो रुपयांचा निधी मंजूरी मिळत असताना या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणी वाली मिळणार का? असा प्रश्न विचारत अहो,कोणी रस्ता करता का रस्ता, अशी आर्त हाक नागरिकांतून गेली अनेक वर्षे दिली जात होती.
कूर-नाधवडे-टिक्केवाडी ३.६०० कि.मी लांबीचा रस्ता आहे. तालुक्यात मोठी लोकसंख्या असलेल्या या गावांना तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यांवर नेहमीच शेकडो वाहनांची सतत वर्दळ असते. २०१० मध्ये चौदा वर्षापूरर्वी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणासाठी सुमारे १ कोटी ९५ लाख रुपये खर्च केले होते. त्यावेळी रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट होत असल्याच्या कारणावरून नाधवडे व टिक्केवाडी ग्रामपंचायतीने काम बंद पाडत रस्त्याचे काम निविदेप्रमाणे चांगले व दर्जेदार व्हावे म्हणून संबंधित खात्यांना लेखी निवेदने देखील दिली होती.पण सार्वजनिक बांधकाम खात्याने पुर्ण दूर्लक्ष केले होते. त्यामुळे पुढील दोन-तीन वर्षातच हा रस्ता पुर्णतः खराब झाला होता. तो आजतागायत तसाच मरणकळा सोसत आहे.
सध्या या रस्त्याची प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर तीन-चार फुटाच्या अंतराने हजारो खड्डे पडले असून खडी उध्वस्त होवून सर्वत्र पसरली आहे. एक-दोन वेळा संबंधित खात्याकडून जागोजागी खड्डे मुजविण्याचा केवळ फार्स करण्यात आला. पण मुजवलेले खड्डे कांही दिवसातच पुन्हा रिकामे झाले. त्यामुळे रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता अशी म्हणण्याची वेळ आली आहे. या रस्त्यांवरुन नागरिकांना पायी चालतांना व वाहने चालवतांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतक-यांनी रस्ता खोदत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे केली आहेत.त्यामुळे रस्त्यावरुन एकच वाहन जावू शकते.दुसऱ्या वाहनाला बाजू देण्यासाठी अतिक्रमणामुळे जागा नाही. शिवाय रस्त्याच्या बाजूपट्टीवर शेतकऱ्यांनी गवत लावल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची गटारे शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने नष्ठ झाली आहेत.त्यामुळे सध्या पावसाचे पाणी रस्त्यावरुनच वाहत आहे.रस्त्यावरील खड्यात पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने सतत अपघात होत आहेत.
विशेष म्हणजे तालुक्यात एकीकडे प्रत्येक गावोगावी व वाड्यावस्त्यांच्या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधीकडून करोडो रुपयांचा निधी आणला गेला आहे. त्यामुळे लोकांतून समाधान व्यक्त होत आहे. पण या रस्त्याचे भाग्य अद्याप उघडलेले नव्हते. यासाठी ग्राम पंचायतींचा पाठपुरावा कमी पडला कि राजकीय स्पर्धेचा हा रस्ता बळी पडला? असा प्रश्न विचारला जात होता. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोण वाली मिळणार अशीही विचारणा होत होती. मात्र या रस्त्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी जातीने लक्ष घालून रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याने ग्रामस्थांतून समाधान होत आहे.
—
अतिक्रमणाचा विळखा !
कूर, नाधवडे व टिक्केवाडी दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. रस्ता अरुंद होवून गटार व साईटपट्ट्या नष्ठ झाल्या आहेत.त्यामुळे रस्त्यावर ऐकेरीच वाहतूक सुरु आहे. समोरुन येणाऱ्या वाहनाला बाजूसुध्दा देता येत नाही. यासाठी रस्ता रुंदीकरणासह अतिक्रमणमुक्त व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
—-