सरवडे येथील किसनराव मोरे हायस्कूलच्या
दहावीच्या विद्यार्थांचा पार पडला स्नेहमेळावा
– तब्बल १५ वर्षानी एकत्र आले विद्यार्थी व गुरुजन
व्हिजन मराठी न्यूज :
सरवडे प्रतिनिधी (अतुल कुंभार)
राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील किसनराव मोरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सरवडे या विद्यालयातील इयत्ता दहावीच्या सन-२००८-०९ सालच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याचे आयोजन प्रशालेच्या प्रांगणात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य बी. जी. कुदळे होते.
तब्बल पंधरा वर्षानंतर एकत्र येत या बॅचच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी समाजशील उपक्रमाचा एक चांगला पायंडा घातला. शालेय वयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी याकरिता अमूल्य अशी ग्रंथ भेट प्रशालेला देण्यात आली. या कार्यक्रमात दिवंगत प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह मोरे, इतिहास विषय शिक्षक एम. एस. कांबळे, परिचर संजय येटाळे यांना श्रद्धांजली वाहून सुरुवात करण्यात आली. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार विद्यार्थ्यांच्या वतीने कोल्हापुरी फेटा व भेटवस्तू देऊन करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षकांनी अनुभव कथन केले. अनेक विद्यार्थ्यांनी शाळेतून मिळालेले संस्कार व शिस्त भावी जीवनात खूप उपयोगी पडत असल्याचे तसेच व्यक्तीमत्व घडण्यात मदत झाल्याचे सांगितले. शाळा व शिक्षक यांना कधीच विसरता येणार नसल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने डी. एम. टिपुगडे, टी.एम. सरदेसाई, आर. व्ही. हालके इत्यादी शिक्षकांनी व अनिकेत हुल्ले, सतीश कुंभार, जयश्री वागवेकर, रेखा वाईंगडे या माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. सर्व उपस्थित माजी विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेशी निगडित अनेक प्रसंग व आठवणींचा उलगडा केला.
स्नेहमेळाव्याचे सूत्रसंचालन अतुल कुंभार यांनी केले. याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य विक्रमसिंह मोरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व स्नेह मेळाव्यातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– – – –