महाराष्ट्रद्रोही अदानीप्रेमी महायुतीचे सरकार उलथवून टाका : उद्धव ठाकरे
आदमापूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांचा प्रचंड गर्दीत प्रचार प्रारंभ
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
(व्हिजन मराठी न्यूज)
आपल्या अडीच वर्षांच्या काळात आपण जनतेच्या विकासाच्या योजना राबविल्या. मात्र या काळात एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ दिला नसल्याने आपलं सरकार विश्वासघाताने पाडलं. ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्रद्रोही विरोधात महाराष्ट्रप्रेमी अशी असून जनतेने या निवडणूकीत गद्दारांना गाडून महाराष्ट्रद्रोही अदानीप्रेमी महायुतीचे सरकार उलथवून टाका, असे आवाहन शिवसेना ( उबाठा ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
राधानगरी- भुदरगड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांचा प्रचार शुभारंभ संपन्न आदमापूर ( ता. भुदरगड ) येथील संत बाळूमामा मंदिरात करण्यात आला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.
यावेळी बोलताना श्री. ठाकरे पुढे म्हणाले, मागील दोन निवडणूकांत ज्या आमदारांना जनतेने विश्वासाने निवडून दिले, त्यांनीच जनतेचा विश्वासघात केला. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरुन नेणाऱ्यांच्या टोळीत राधानगरीचा आमदार सामील झाला हे मोठे दुर्दैव आहे. आपल्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी करणाऱ्या ४० जणांच्या टोळक्याला स्वाभिमानी जनताच आता घरी बसवणार असून या गद्दारांना गाडण्याची सुरुवात जनतेने राधानगरीतून करावी.
श्री. ठाकरे म्हणाले, यंदा महाविकास आघाडीचे सरकार आणणारचं असून आपण राज्याला स्थिर सरकार देणार आहे. सध्याच्या टक्केवारीच्या सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील करुन टाकले आहे. आपल्या काळात महागाई वाढू न देता पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर ठेवणार आहे. मालवणच्या शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांची जाऊ तिथं खाऊ हीच प्रवृत्ती आहे. भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे मंदिर आपले सरकार बांधणार आहे. तर महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी महिला पोलिसांची भरती करून स्वतंत्र महिला पोलिस स्टेशनची उभारणी करणार आहे.
आम. सतेज पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या पहिल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मांडीला मांडी लावून काम केलेल्यांनी स्वार्थासाठी त्यांचा विश्वासघात केला. ही गद्दारी राज्यातील स्वाभिमानी जनतेला रुचलेली नसून त्याचा परिणाम या विधानसभा निवडणूकीत दिसणार आहे. आजच्या सभेला झालेली गर्दी पाहता ही सभा के. पी. पाटील यांच्या प्रचाराची नसून विजयाची सभा आहे.
उमेदवार के. पी. पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या आणि शिवसेनेच्या प्रचाराची सुरुवात करण्याचा बहुमान उद्धव ठाकरे यांनी राधानगरीला दिला यातच आपल्या जीवनाचे सार्थक झाले. गद्दारांच्या यादीत विद्यमान आमदारांनी सामील होऊन राधानगरीचे नाव बदनाम करण्याचे पाप केले. पाटगाव धरणाचे पाणी अदानीला देणाऱ्या आबिटकरांना जनता यंदा पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी प्रकाश पाटील, संजयसिंह पाटील, विजयसिंह मोहिते, शरद पाडळकर यांनीही मनोगते व्यक्त केली.
या सभेस खा. शाहू महाराज, अरुण दुधवडकर, मिलिंद नार्वेकर, तेजस ठाकरे, विजय देवणे, संजय पवार, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, सुनील शिंत्रे, हिंदूराव चौगले, शामराव देसाई, राहूल देसाई, अनिल घाटगे, जयवंतराव शिंपी, राजेश पाटील, आर. के. मोरे, सदाशिव चरापले, मुकुंदराव देसाई, पंडीत केणे, धनाजी देसाई, मधुकर देसाई, प्रा. किसन चौगले, अभिजित तायशेटे, धैर्यशील पाटील-कौलवकर, राजू शमनजी, विश्वनाथ कुंभार, उमेश भोईटे, सुरेश चौगले, यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षातील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रकाश पाटील यांनी मानले.
– – – – – – – –
गद्दारांना नाही माफी, यंदा आमदार के. पी….
या प्रचार शुभारंभावेळी के. पी. यांच्या समर्थकांनी विविध घोषणांचे फलक सभास्थळी लावली होती. शिवसेनेत बंड झाल्यावर उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेऊन शिंदेंसेनेत गेलेल्या आमदारांत राधानगरीच्या विद्यमान आमदारांचाही समावेश होता. याला अनुसरुन लावलेल्या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यातील पन्नास खोके, एकदम ओके आणि गद्दारांना नाही माफी, यंदा आमदार के. पी. या घोषणा लक्षवेधी होत्या.
– – – – – – – –
भव्य मोटरसायकल रॅली आणि प्रचंड गर्दी
सभेला येण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गारगोटी ते आदमापूर पर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर कार्यकर्ते सभास्थळी आले. त्यांच्या मोठ्या उपस्थितीने सभामंडप खचाखच भरुन गेला होता. अनेक कार्यकर्ते सभामंडपाच्या बाहेर उभारलेल्या स्क्रिनवर सभेचे थेट प्रक्षेपण पाहत होते.
– – – – – – – – –
महिलांनी आणला ३०० किलोचा हार
या प्रचारसभेला मतदारसंघातून आलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. डोक्यावर भगवी टोपी आणि गळ्यात मशाल चिन्हाचा स्कार्फ घालून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी १० फूट उंचीचा आणि ३०० किलो वजनाचा फुलांचा हार आणला होता. हा हार क्रेनच्या सहाय्याने ठाकरे यांना घालण्यात आला.
– – – – – –