नाभिक समाजासाठी कल्याणकारी योजना राबवून जीवनमान उंचावू : मुश्रीफ
पालकमंत्री हसन मुश्रीफ; मतदारसंघातील नाभिक समाज बांधवांचा स्नेहमेळावा
बिद्री /बामणी
टी. एम. सरदेसाई
(व्हिजन मराठी न्यूज)
नाभिक समाज हा सेवावृत्ती समाज आहे. या समाजासाठी कल्याणकारी योजना राबवून त्यांचे जीवनमान आणि राहणीमान उंचावू. असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार संजयबाबा घाटगे उपस्थित होते.
बामणी (ता. कागल) येथे आर. के. मंगल कार्यालयात आयोजित कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील नाभिक समाजाच्या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय नाभिक संघटनेचे अध्यक्ष भगवानराव भिडवे होते. या स्नेहमेळाव्याला समाज बांधव आणि भगिनींनी जोरदार प्रतिसाद दिला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, नाभिक समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्याच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला आहे. आपली जी काही कामे बाकी आहेत, त्याची पूर्तता करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. आपल्या समाजाने नेहमीच माझी पाठराखण केली आहे. त्यामुळे आपले ऋण आपण कधीही विसरणार नाही. हा मेळावा म्हणजेच आपल्या गोतावळ्याचे स्नेहसंमेलनच आहे.
— — —
शुरवीर शिवा काशिद यांचे योगदान !
आपल्या व्यवसायामुळे मानवी चेहऱ्याला सुंदरता प्राप्त झाली. नाभिक समाजातील शूरवीर शिवा काशीद यांचे मराठा साम्राज्यासाठी फार मोठे योगदान लाभले आहे. त्यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान पिढ्यान् पिढ्या प्रेरणादायी ठरेल. समाजाला ऐतिहासिक परंपरा आहे. असे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी भाषणात मत व्यक्त केले.
— — — —
अखिल भारतीय नाभिक समाजाचे अध्यक्ष भगवान बिडवे म्हणाले, इतर मागासवर्गीय समाजाचे महामंडळात रूपांतर करण्यासाठी मुश्रीफ यांनी प्रयत्न करावा. नाभिक समाजाचे कौतुक करताना विजय काळे म्हणाले, स्वाभिमानी नाभिक समाज आज जिद्द व चिकाटीने यशस्वी वाटचाल करीत आहे. स्वागत शिवाजी कमळकर यांनी केले. प्रास्ताविक साताप्पा माने यांनी केले. माधुरी शिंदे, विजय काळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील. केडीसीसीचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, धनराज घाटगे, सिद्धाराम गंगाधरे, सोनूसिंह घाटगे, कृष्णात सूर्यवंशी, सुरेश मर्दान, अनिल संकपाळ, विलास संकपाळ, एम. के. संकपाळ आदी उपस्थित होते.
— — –