हिमालयासारखे पाठीशी असणारे स्वर्गीय गणपतराव फराकटे यांच्यामुळे पोकळी निर्माण झाली : मुश्रीफ
– बोरवडे येथे गाव भेट संपर्क सभा
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
(व्हिजन मराठी न्यूज)
पंचवीस वर्षांच्या आमदारकीच्या आणि मंत्रीपदाच्या काळात देशातील सर्वाधिक विकासनिधी मी कागल मतदारसंघात आणला. मी केलेल्या विकास कामांचा डोंगर पाहिला तर विरोधकांचे डोळे पांढरे होतील. हा डोंगर पाहून विरोधकांचे विधानसभा निवडणूक लढवण्याचे धाडस होणार नाही. माझ्या अनेक निवडणूकीत हिमालयासारखे पाठीशी असणारे स्वर्गीय गणपतराव फराकटे यांच्यामुळे पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्याविना ही सभा पार पडत आहे. असे सांगताना मंत्री हसन मुश्रीफ यांचा कंठ दाटून आला. बोरवडेकरांनी यातून सावरावे व मनोज फराकटे यांच्या पाठीशी रहावे. परिस्थितीशी सामना करावा. असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले
बोरवडे ( ता. कागल ) येथे आयोजित गाव भेट दौऱ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पं. स. सदस्य रघुनाथ कुंभार होते. यावेळी त्यांनी परिसरातील बिद्री, वाळवे खुर्द, उंदरवाडी, फराकटेवाडी या गावांतील मतदारांशी थेट संवाद साधला.
ना. मुश्रीफ पुढे म्हणाले, आपण केलेल्या प्रचंड कामाच्या बळावर आपला सहावा विजय निश्चित असून यंदाच्या विजयात संजयबाबा घाटगे यांच्या कार्यकर्त्यांचा वाटा निश्चितच मोठा असणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना भविष्यात मानसन्मान देण्याचा आपण शब्द दिला असून त्याला तडा जाऊ न देण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.
यावेळी बोलताना माजी आम. संजयबाबा घाटगे म्हणाले, अनेक वर्षे आपल्याला सामान्य माणसांनी पाठबळ दिले. परंतू सत्तेच्या राजकारणात त्यांच्या उपकाराची परतफेड करण्यात आपण कमी पडलो. त्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी आपण ना. मुश्रीफ यांना बिनशर्त पाठिंबा दिला असून ते आपला विश्वास निश्चितच सार्थ ठरवतील. स्वर्गीय ज्ञानदेव फराकटे, पी. डी. मगदूम यांचा राजकीय काळ वेगळा होता. तत्वशील माणसे यांची नेहमी आठवण राहते.
—- —- –
स्व. गणपतराव तात्यांच्या आठवणीने ना. मुश्रीफ गहिवरले
ना. मुश्रीफ यांच्या विधानसभेच्या सहाही निवडणूकांत बोरवडे गावाने त्यांना महत्वपूर्ण मताधिक्य दिले होते. गावचे माजी सरपंच व बिद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन गणपतराव फराकटे यांनी ना. मुश्रीफ यांची सातत्याने पाठराखण केली. दोन महिन्यांपूर्वी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर आज प्रथमच झालेल्या संवाद भेटीवेळी सर्वच वक्त्यांनी स्व. गणपतराव फराकटे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ना. मुश्रीफ हे ही तात्यांच्या आठवणीने गहिवरले. त्यामुळे काही काळ वातावरण धीर गंभीर बनले होते.
— — —
याप्रसंगी बिद्री साखर कारखान्याचे संचालक मनोज फराकटे, रघुनाथ कुंभार यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी अन्नपूर्णा संचालक आनंदराव साठे, साताप्पा साठे, तानाजी साठे, सुनील मगदूम, जयदीप पोवार, के.के. फराकटे, पांडुरंग पाटील, ज्ञानदेव फराकटे, प्रदिप कांबळे, उपसरपंच विनोद वारके, पांडूरंग खाडे, नामदेव पाटील, पांडुरंग पाटील, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत अशोक कांबळे यांनी केले. आभार उपसरपंच विनोद वारके यांनी मानले.
— —