वाचनाने जीवनात समृद्धी येते : प्राचार्य डॉ. संजय पाटील
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
(व्हिजन मराठी न्यूज)
मानव प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा असल्याने त्याने संस्कृती निर्माण केली. वाचन संस्कृती हा त्याचाच एक भाग आहे. वाचनाने मानवी जीवनात समृद्धी येऊन तो सुसंस्कृत होतो. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले.
बिद्री (ता. कागल) येथे राज्य शासनाच्या व शिवाजी विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार दूधसाखर महाविद्यालयात मराठी, ग्रंथालय,एनएसएस, एनसीसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती , छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे प्रकट वाचन आणि वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने “वाचाल तर वाचाल ” या विषयावरच्या मार्गदर्शनावेळी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी नॅक समन्वयक डॉ. एस. जी. खानापुरे, एनसीसीचे लेफ्टनंट प्रा. .समीर घोडके प्रमुख उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, दूरचित्रवाणी, संगणक, भ्रमणध्वनी, रेडिओ या मनोरंजनाच्या आणि ज्ञानाच्या साधनांमुळे ग्रंथ वाचन कमी झाले आहे. परंतु ग्रंथ वाचनामुळे मनोरंजन, ज्ञानप्राप्ती, प्रबोधन, व्यक्तिमत्व विकास व शब्द सामर्थ्य वाढते. व्यक्तीला ग्रंथ वाचनाचा कोणत्याही क्षेत्रात फायदा होतो म्हणून चरित्रे, आत्मचरित्रे , आत्मकथने, कविता, कथा, कादंबरी, प्रवासवर्णने यांचे वाचन केल्याने वाचन संस्कृती वाढते. शिवाय व्यक्ती सुसंस्कृत होते.
यावेळी प्र. के. अत्रे, साने गुरुजी, महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण, नरेंद्र जाधव, सर्व संत साहित्य, नारायण सुर्वे, कुसुमाग्रज, कवयित्री बहिणाबाई चौधरी, प्राचार्य बी.एम हिर्डेकर यांच्या ग्रंथातील अनेक उदाहरणे देऊन ‘ ग्रंथ हाच गुरु’, मानून मानवी जीवन समृद्ध करण्याची ताकद फक्त वाचनात आहे, म्हणून “वाचन वेडे व्हा”आणि “वाचाल तर वाचाल”असा कानमंत्र शेवटी त्यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या मजकुराचे प्रकट वाचन प्रा. डॉ. ए. जे. वारके यांनी केले. या प्रसंगी दूधसाखरच्या माजी विद्यार्थिनींनी भौतिकशास्त्र विषयात कु. अलका भोईटे, वनस्पतीशास्त्र विषयात कु. .कोमल कुराडे यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएच. .डी. पदवी मिळविल्याबद्दल व डॉ. एस. ए .गंगावणे यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
प्रारंभी डॉ. .ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. अतुल नगरकर यांनी तर आभार प्रा. .डॉ. एस. एन. कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी जे. डी. कांबळे, संग्राम भोईटे यांनी परिश्रम घेतले. तर प्रा. सुनील मिठारी यांनी ऑनलाइन प्रश्नमंजुषा तयार करण्यासाठी सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रदीप कांबळे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.
— — –