बिद्री साखर कारखाना ११ लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट गाठणार
– बॉयलर अग्नीप्रदीपन कार्यक्रमात अध्यक्ष के. पी. पाटील यांची माहिती
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यूज)
बिद्री साखर कारखान्याने सन २०२४-२५ च्या चालू गळीत हंगामात कारखान्याने ११ लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले असून गाळप व उताऱ्यासह अनेक उच्चांक या गळीत हंगामात सर्वांच्या सहकार्याने करुया. असे आवाहन बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले.
बिद्री (ता. कागल) येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ गळीत हंगाम व डिस्टिलरी प्रकल्पाच्या बॉयलर अग्निप्रदिपन समारंभात ते बोलत होते. यावेळी संचालक सुनिलराज सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी सौ. निताराणी सुर्यवंशी या उभयंतांच्या हस्ते कारखाना बॉयलरचे व डिस्टलरी विभागाकडील बॉयलर अग्नीप्रदीपन संचालक राजेंद्र पाटील व त्यांच्या पत्नी सौ. निर्मला पाटील या उभयतांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, सध्या असलेला साखरेचा एस.एम.पी. दर अतिशय कमी आहे. त्यामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने सातत्याने मागणी केली जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने केंद्र शासन एसएमपी दरमध्ये वाढ करेल अशी अपेक्षा आहे मात्र अद्यापही या दृष्टीने कोणताही सकारात्मक निर्णय झालेला दिसत नाही. बिद्री साखर कारखाना हा सातत्याने उच्चांकी ऊसदर देण्यात अग्रेसर असतो, हिच परंपरा आगामी हंगामातदेखील कायम ठेवली जाईल.
सर्व सामान्य ऊस उत्पादक शेतकरी व या संबंधित सर्वांच्या योगदानामुळे बिद्री साखर कारखाना यशाची भरारी घेत आहे. कारखान्याच्या कामगारांच्या सामूहिक प्रयत्नामुळे अनेक संकटे येवूनदेखील हा कारखाना यशस्वी वाटचाल करत आहे. कामगारांना अपेक्षित बोनस दिला जाणार असून रोजंदारी कामगारांनाही लवकरच न्याय दिला जाईल.
— — — — —
कामगारांचे योगदान…!
‘बिद्री’ ची प्रगती होण्यापाठीमागे कामगारांचे योगदान मोलाचे आहे. ज्या ज्या वेळी प्रासंगिक संकटे येतील त्यावेळी ‘बिद्री ‘ च्या कामगारांनी हातातील पाने खाली ठेवून संकटाशी सामना केला आहे. असा गौरव करीत के. पी. पाटील म्हणाले, कामगारांनी न बोलता बोनस सह अन्य आर्थिक सुविधा देत सन्मान केला आहे. येत्या कांही दिवसात रोजंदारी कामगारांचा प्रश्न निकाली निघेल. चालू गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडावा असे आवाहन केले..
— — — — —
यावेळी स्वागत कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी केले. कार्यक्रमास प्रविणसिंह पाटीस, धनाजीराव देसाई, पंडीतराव केणे, उमेश भोईटे, मधूकर देसाई, के. ना. पाटील, डी. एस. पाटील, सत्यजित जाधव, राहूल देसाई, राजेंद्र मोरे, रंगराव पाटील, मनोज फराकटे, दीपक किल्लेदार, रविंद्र पाटील, संभाजी पाटील, राजेंद्र भाटले, रणजित मुडुकशिवाले, फिरोजखान पाटील, रामचंद्र कांबळे, फत्तेसिंग पाटील, रावसाहेब खिलारी, सौ. क्रांती उर्फ अरुंधती संदिप पाटील, सौ. रंजना आप्पासो पाटील, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई यांच्यासह सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
———