१०५८ उमेदवारांना एस.टी. महामंडळाच्या सेवेत सामावून घेणार !
– एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांची माहिती
कोल्हापूर :
टी. एम. सरदेसाई
(व्हिजन मराठी न्यूज )
एस. टी. महामंडळात सरळसेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदावर सामावून घेतले जाणार आहे. अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी बुधवारी ‘व्हिजन मराठी ‘ शी बोलताना दिली.
श्री गोगावले म्हणाले, सन २०१९ च्या भरतीमध्ये निवड झाल्यापैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भरती मधिल प्रतिक्षा यादीवरील सुमारे ३३७ उमेदवारांना नेमणूक देण्याची प्रक्रिया महामंडळात सुरू करण्यात येत आहे. तसेच, प्रतिक्षा यादीवरील उर्वरित सर्व ७२१ उमेदवारांना आवश्यकते प्रमाणे व रिक्त जागेनुसार राज्य परिवहन सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. असे त्यांनी सांगितले.
या संदर्भात संबंधित उमेदवार, लोकप्रतिनिधींनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अध्यक्ष भरत गोगावले यांना भेटून भरतीबाबत निवेदन सादर केले होते. त्यांच्या निवेदनाचा विचार करून त्यांना तातडीने नेमणुका देण्याच्या सूचना अध्यक्ष श्री. गोगावले यांनी दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार संबंधितांना नेमणुका देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, या सर्व पात्र उमेदवारांतून समाधान व्यक्त होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अध्यक्ष श्री गोगावले यांचे आभार व्यक्त होत असल्याचे राज्य मार्ग परिवहन महामंडळ जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी सांगितले.
— — –