सर्वसामान्य व गोरगरिबांची सेवा हेच माझे व्रत : मुश्रीफ
– शेंडूर येथे विविध विकास कामांचे लोकार्पण
कागल : टी. एम. सरदेसाई
सर्वसामान्य व गोरगरीबांची सेवा करीत राहणे माझे व्रत आहे. काम करत राहणे हे आपले कर्तव्य आहे. आयुष्यभर आपण हेच करत आलो आहे. यापुढेही सर्वसामान्यांच्या हितासाठीच काम करत राहू, गोरगरिबांच्या सेवेला आपण वाहूनच घेतले आहे. असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
शेंडूर ( ता. कागल) येथील विविध विकास कामांचा शुभारंभ व शेतकरी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले गेल्या ३०-३५ वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनामध्ये आपण सामान्य माणूसच केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी काम करत आलो आहे. कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत त्याचा लेखाजोखा मांडणारी पुस्तिका लवकरच आपल्या हातात पडेल त्यावेळी आपण किती काम करू शकलो हे पहावयास मिळेल असेही मंत्री म्हणाले.
संजयबाबा घाटगे म्हणाले, आपण कधी व्यक्तिगत पातळीवर कोणाला विरोध केला नाही. मात्र कायम आपण चांगले काम करणाऱ्याचे कौतुक केले. मंत्री मुश्रीफ हे सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करणारे नेतृत्व आहे. गोरगरिबांना न्याय देणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणून मुश्रीफ यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल. म्हणूनच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे. कागल विधानसभा मतदारसंघ हा सर्वात श्रीमंत भाग म्हणून ओळखला जाईल. अशा पद्धतीचे काम त्यांच्या हातून या पुढील काळात व्हावे अशी अपेक्षा आहे.
यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्षा सौ.शितल फराकटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, सरपंच अमर कांबळे, उपसरपंच संदीप लाटकर, तुकाराम शिंदे, लक्ष्मण गोरडे, बाबुराव शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, धनराज घाटगे, गुणाजीराव निंबाळकर, मधूकर मेथे, मधूकर भांडवले, अशोक ढवण, तुकाराम शिंदे, हरी बोडके, बाळासो डोंगळे, शंकर पोवार, लक्ष्मण गोरडे, निवृत्ती निकम, निखिल निंबाळकर आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक सुखदेव मेथे यांनी केले.
— –