लेकीच्या लग्नाचा मंडप राहूनच गेला;
‘शिवानी’ चा प्रवास अर्ध्यावरच राहिला !
– चोवीसाव्या वर्षीच घेतला जगाचा निरोप
बिद्री : सागर सरदेसाई ( व्हिजन मराठी न्यूज)
कागल तालुक्यातील बिद्री येथील शिवानी सदाशिव पाटील हिने अल्पशा आजाराने वयाच्या २४ वर्षी जगाचा निरोप घेतला. पुण्यामध्ये नोकरीस असणारी शिवानी महिन्यापूर्वी आजोबाचे निधन झाल्यामुळे गावी आली होती. किरकोळ तापाने सुरवात होत हा ताप अंगभर भिनला. उपचार करण्यात आले. पण उपयोग झाला नाही. मात्र मृत्यूने तिला अखेर गाठलेच. दिवाळी वडिलांनी तिच्या लग्नाचा विचार करीत तयारी सुरु केली होती. वडील सदाशिव यांचा स्वतः चा मंडप व्यवसाय आहे. त्यामुळे तिच्या लग्नात मंडप घालण्याचा मनोदय ठरवून ठेवला होता. पण नियतीला पाहवले नाही. ‘शिवानी’ चा प्रवास अर्ध्यावरच राहिला. त्यामुळे लेकीच्या लग्नाचा मंडप राहूनच गेला !
मेहनती व धडपड्या स्वभावाच्या सदाशिव पाटील (मंडपवाले) यांनी पडेल ते काम करुन पत्नीच्या साधीने कुटुंबाचा चरितार्थ चालवला. त्यांच्या संसाराच्या वेलीवर सुरज व शिवानीच्या रुपाने दोन सुंदर फुले उमलली. शिवानीने तर आपल्या गोड स्वभावाने घरात तसेच शेजारी सर्वांना लळा लावला होता. मैत्रिणीमध्येही तिने सर्वांना आपलेसे केले होते. शाळेतही तिने आपली चुणुक दाखवत दहावी, बारावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले होते. बारावीनंतर बीएसस्सीचे शिक्षण घेऊन ती गेल्याच वर्षी पुण्यात नोकरीस लागली होती. पंधरा दिवसांपूर्वी आजोबांचे निधन झाल्याने ती गावी आली होती. मागील आठवड्यात तिला किरकोळ ताप आल्याचे निमित्त झाले. हा ताप वाढत गेल्याने तिची प्रकृती गंभीर बनली. यातच रविवारी तिचे आकस्मिक निधन झाले.
शिवानीने जिद्दीने शिक्षण पूर्ण करुन आता कुठे सुंदर आयुष्याची सुरवात केली होती. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. शिवानीच्या या दुर्दैवी मृत्यूने तिच्या कुटुंबियांसह ग्रामस्थानांही मोठा धक्का बसला. हसऱ्या शिवानीच्या या अकाली मृत्यूने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या पश्चात वडील, आई, भाऊ, चुलता, चुलती असा परिवार आहे.
————-