‘बिद्री ‘ च्या संचालकपदी माजी जि. प. सदस्य मनोज फराकटे यांची निवड
– संचालक मंडळाच्या सभेत सर्वानुमते निवड जाहिर.
बिद्री : व्हिजन मराठी न्यूज प्रतिनिधी
बिद्री ( ता. कागल ) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या रिक्त संचालकपदी बिद्री-बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे माजी सदस्य मनोज गणपतराव फराकटे यांची निवड करण्यात आली. त्यांचे वडील व कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव गुंडू फराकटे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या संचालकपदावर मनोज फराकटे यांची निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक उपसंचालक ( साखर ) जी. जी. मावळे यांच्यासह व्ही. एम. पाटील, कारखान्याचे अध्यक्ष, माजी आम. के. पी. पाटील प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी मनोज फराकटे यांचे नाव संचालक सुनील सूर्यवंशी यांनी सुचवले त्यास रणजीत मुडकशिवाले यांनी अनुमोदन दिले.
स्वर्गीय गणपतराव फराकटे हे २००५ पासून ऑगस्ट २०२४ अखेर सलग २० वर्षे संचालक पदावर होते. २००५ साली पहिल्यांदाच निवडून आल्यावर त्यांना उपाध्यक्षपद मिळाले होते. त्यानंतर डिसेंबर २०२३ साली झालेल्या निवडणूकीनंतर जानेवारी महिन्यात त्यांना दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदी संधी मिळाली. बिद्री कारखान्यात उपाध्यक्ष म्हणून काम पाहत असतानाच २४ ऑगस्ट २०२४ रोजी गणपतराव फराकटे यांचे निधन झाले होते.
त्यामुळे रिक्त पदासाठी आज कारखाना कार्यालयीन सभागृहात संचालक मंडळाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रिक्त पदासाठी मनोज फराकटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासिन अधिकारी जी. जी. मावळे यांनी जाहीर केले. निवडीनंतर अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या हस्ते नुतन संचालक मनोज फराकटे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मनोज फराकटे म्हणाले, माझे वडील कै.गणपतराव फराकटे यांची काम करण्याची सचोटी आणि संस्था सक्षम करण्याचा त्यांचा सहकारातील प्रदिर्घ अनुभव याचा विचार करत कारखान्याची प्रगती व ऊस उत्पादक सभासदांना सर्वाधिक दर मिळावा यासाठी प्रयत्नशील राहीन. संचालक मंडळाच्या सहकार्याने कारखान्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
— — –
मनोज फराकटे यांचा अल्प परिचय……
मनोज फराकटे हे उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण एम. बी. ए. पर्यंत झाले आहे. २०१६ ते आजअखेर ते हुतात्मा स्वामी वारके सहकारी सुतगिरणीचे संचालक आहेत. २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणूकीत ते विजयी होऊन सर्वांत तरुण सदस्य म्हणून सभागृहात गेले होते. पाच वर्षांच्या कालावधीत त्यांनी लाखो रुपयांचा निधी मतदारसंघासाठी खेचून आणला होता. त्यांच्या रुपाने कारखान्याला उच्चशिक्षित तरुण संचालक लाभले आहेत.
– —-
फराकटे घराण्यातील तिसरे संचालक…….
१९८० च्या दशकात बोरवडे गावचे वीस वर्षे सरपंच म्हणून काम पाहिलेले कै. ज्ञानदेव गुंडू फराकटे ( आबाजी ) हे नुतन संचालक मनोज फराकटे यांचे ज्येष्ठ चुलते होत. ज्ञानदेव फराकटे हे १९९५ ते २००० या काळात बिद्रीचे संचालक होते. तर मनोज यांचे वडील स्व. गणपतराव फराकटे ( तात्या ) हे २००५ ते ऑगस्ट २०२४ अखेर सलग वीस वर्षे बिद्रीच्या संचालक मंडळात होते. आता मनोज यांच्या रुपाने फराकटे घराण्याला बिद्रीच्या संचालक मंडळात तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.
— — –
तात्यांच्या आठवणीची भावूक किनार…. त्यांनी गुलाल उधळलाच नाही !
बिद्री च्या संचालकपदी मनोज फराकटे यांची निवड निश्चित मानली जात होती. त्यामुळे बोरवडे व परिसरातील कार्यकर्त्यांनी कारखाना स्थळावर गर्दी केली होती. पण निवडीला
तात्यांच्या आठवणीची भावूक किनार होती. त्यामुळे ‘बिद्री ‘ चे मानाचे पद मिळून ही कार्यकर्त्यांनी घोषणा, हार, गुच्छ किंवा आनंद व्यक्त केला नाही. निवडीला भावूक किनार असल्यामुळे त्यांनी गुलाल ही उधळला नाही !
— —
तात्यांच्या आठवणीने के. पी. पाटील भावूक !
बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे (तात्या) यांचे मागील महिन्यात निधन झाले होते. या रिक्त जागी त्यांचे सुपुत्र मनोज फराकटे यांची निवड झाली. निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांना स्वर्गीय गणपतराव फराकटे यांच्या आठवणीने गहिवरून आले. एक तत्वशील, सरळमार्गी व्यक्तीमत्व होते. आपल्या भाबड्या व्यक्तीमत्वाने सर्वांना आपले केले होते. पण काळाने घाला घालत आपणातून त्यांना हिरावून नेले. असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. मनोज फराकटे यांची निवड ही सर्वानुमते झाली आहे. भावी काळात तात्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करावे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीस शुभेच्छा व्यक्त करतो.
— –