‘बिद्री’ च्या संचालकपदी मनोज फराकटे यांची निवड निश्चित ?
– मंगळवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत शिक्कामोर्तब
बिद्री : व्हिजन प्रतिनिधी
बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या संचालक पदासाठी मंगळवारी त्यांचे सुपुत्र व माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे यांची निवड १ ऑक्टोबर रोजी विशेष संचालक मंडळाच्या सभेत जवळपास निश्चित मानली जात आहे.
नामदार हसन मुश्रीफ यांचे कागलच्या पश्चिम भागातील गणपतराव फराकटे हे प्रमुख खंदे समर्थक होते. ना. मुश्रीफ यांच्या सलग विजयात बोरवडे व बोरवडे परिसरातून मोठी साथ मिळाली होती. श्री फराकटे सन २००५ पासून ते ऑगस्ट २०२४ अखेर सलग २० वर्षे बिद्री साखर कारखान्याचे संचालक पदावर होते. २००५ साली पहिल्यांदाच निवडून आल्यावर त्यांना उपाध्यक्षपद मिळाले होते. त्यानंतर डिसेंबर २०२३ साली झालेल्या निवडणुकीनंतर जानेवारी महिन्यात त्यांना दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदी संधी मिळाली होती. परंतु आजारापणामुळे २४ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे ना. मुश्रीफ यांना मोठा धक्का सहन करावा लागला. फराकटे कुटुंबियाशी ना. मुश्रीफ यांचे अनामिक नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे मनोज फराकटे यांना जिल्हा परिषद सदस्य व ताकद देत आहेत.
स्वर्गीय गणपतराव फराकटे यांच्या अकाली निधनानंतर मनोज फराकटे यांच्यावर राजकीय जबाबदारी आली आहे. त्यामुळे रिक्त जागेवर मनोज फराकटे यांची निवड निश्चित मानली जात आहे.
‘बिद्री ‘ संचालक रिक्त जागेसाठी मंगळवारी दि. १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता संचालक मंडळाची सभा बोलावण्यात आली आहे. प्रादेशिक उपसंचालक (साखर) जी. जी. मावळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
— —