बिद्रीच्या सरपंचपदी मंडलिक गटाच्या पूजा पाटील यांची बिनविरोध निवड
बिद्री : ( व्हिजन प्रतिनिधी )
कागल तालुक्यातील बिद्री येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी खासदार संजय मंडलिक गटाच्या पूजा दिगंबर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीबाबत झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी माधव उर्फ संभाजी व्हरकट होते.
कागल तालुक्यातील नावाजलेली व मोठी बिद्री ग्रामपंचायत आहे. गावात चार राजकीय गट आहेत. त्यामुळे निवडणूकीतील नेहमीच चुरस पहावयास मिळते. निवडनिणूकीत जरी चुरस असली तरी ग्रामपंचायतीचा कारभार सर्व एकत्र येवून करतात. निवडणुकीत ठरलेल्या सूत्रानुसार मंत्री मुश्रीफ गटाचे सरपंच पांडुरंग चौगले यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पुढील संधी माजी खासदार संजय मंडलिक गटाच्या सौ. पूजा पाटील यांना देवून सर्वामते निवड करण्यात आली.
यावेळी मावळते सरपंच पांडुरंग चौगले यांचा सत्कार सदस्य अशोक उर्फ अप्णा पोवार व उपसरपंच आनंदा पाटील यांच्या हस्ते, निवडणूक अधिकारी श्री व्हरकट यांचा पांडूरंग चौगले यांच्या हस्ते व नूतन सरपंच सौ. पूजा पाटील यांचा सत्कार सर्व महिला सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.
नूतन सरपंच सौ. पूजा पाटील यांनी मला सर्वांच्या सहकार्याने सरपंचपदाची संधी मिळाली आहे. सर्वांना बरोबरीने घेवून गट-तट न पहाता कारभार करीत असल्याची ग्वाही दिली.
यावेळी उपसरपंच आनंदा पाटील, सदस्य अशोक पोवार, सागर कांबळे, शोभा चौगले, शीतल गायकवाड, सुशांत चौगले, शोभाताई पाटील, सुलोचना पाटील आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी बी. के. कांबळे यांनी केले. आभार शहाजी गायकवाड यांनी मानले.
निवडीनंतर समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी केली. हलगीच्या कडाकडात व धनगरी ढोलाच्या निनादात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सर्व गटाचे स्थानिक नेते, समर्थक व बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. मिरवणूकीनंतर आभार दिगंबर पाटील यांनी मानले.
— –