फराकटेवाडीच्या समृद्धीने केला काश्मीरमधील सर्वोच्च 14 हजार फूट उंचीचा ‘गडसर पास’
बोरवडे : प्रतिनिधी
जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट सहजपणे शक्य होते. आत्मविश्वास आणि आवड या गुणांची सांगड घालत फराकटेवाडी (ता.कागल ) येथील समृद्धी शिवाजी फराकटे काश्मीरमधील सर्वोच्च असणारे 14 हजार फूट उंचीच्या गडसर पास या ठिकाणावर यशस्वी चढाई केली.
समृद्धीला चार-पाच वर्षापासून ट्रेकिंगचा छंद जडला. महाराष्ट्रातील तसेच भारतातील विविध ठिकाणी तिने ट्रेकिंगच्या माध्यमातून अनेक ठिकाणी यशस्वीपणे चढाई केली आहे. ओंकार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीच्या शिवसह्याद्री ट्रेकिंग ग्रुपच्या माध्यमातून काश्मीर मधील गडसर पास हे सर्वोच्च ठिकाण सर करण्यासाठी ती सहभागी झाली. या ग्रुपमध्ये आणखीन विस जणांचा समावेश होता.
खडतर आव्हानांचा सामना करत रोज 13 ते 14 किलोमीटरची चढाई करत सहा दिवसात मोहीम फत्ते केली. समृद्धी सध्या मुंबईमध्ये वास्तव्यास आहे. तरीही तिला गावची ओढ स्वस्थ बसू देत नसल्याने नेहमी तिचे गावी येणे सुरु असते.
ट्रेकिंगच्या माध्यमातून भारतातील अतिउंच असणाऱ्या ठिकाणावर चढाई करण्याची आपली इच्छा आहे असे समृद्धीने सांगितले. अशा मोहिमेसाठी जाण्यासाठी आपल्याला आई-वडिल व ओंकार जोशी यांचे सहकार्य मिळत असल्याचे तिने सांगितले.
— –