महाविद्यालयातील शिक्षक पालक संघ सक्रिय हवा : प्राचार्य डॉ. संजय पाटील
बिद्री : (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांबरोबर पालकांचाही सहभाग महत्त्वाचा असल्याने महाविद्यालयातील शिक्षक पालक संघ सक्रिय हवा, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले. ते बिद्री येथील दूधसाखर महाविद्यालयातील शिक्षक पालक संघाच्या बैठकीत बोलत होते .
डॉ. पाटील पुढे म्हणाले, महाविद्यालयीन जीवनातील विद्यार्थी परिपक्वतेकडे वाटचाल करणारे असतात. या वयात त्यांच्या बौद्धिक, सांस्कृतिक , शारीरिक विकासाकडे शिक्षकांबरोबर पालकांनीही लक्ष ठेवायला हवे. विद्यार्थी महाविद्यालयात शिकतात, शिक्षकांची ती जबाबदारी आहे असे म्हणून चालणार नाही. शिक्षक पालक एकत्रित आले, चर्चा झाली तर त्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळेल. म्हणून शिक्षक पालक संघाच्या बैठका आणि पालकांचे मेळावे होणे गरजेचे असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले आणि महाविद्यालयातील अभ्यासक्रम आणि अभ्यासेत्तर उपक्रमांचा आढावा घेतला . यावेळी पालक अमर चौगुले यांनी महाविद्यालयातील दैनंदिन कामाविषयी माहिती जाणून घेतली. प्रा. समीर घोडके यांनी राष्ट्रीय छात्र सेना विभागाची सविस्तर माहिती दिली.
यावेळी अधीक्षक एस. के.पाटील, बाबसिंग पो, शिक्षक पालक संघाचे सदस्य श्रीकांत मोरे,बाजीराव पाटील, रमेश कांबळे, रमेश वारके हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी व प्रास्तविक डॉ. एस. एन. कुलकर्णी यांनी तर आभार प्रा. ए . बी. माने यांनी मानले.
— —