- ग्रंथदान उपक्रम : जिल्ह्यातील शाळाशाळांतून वाचन संस्कृती वाढवणे आवश्यक.- माजी खासदार निवेदिता माने.
– जीवन साळोखे यांचेकडून पाचशे पुस्तकांची पंचवीस हायस्कूल्सना भेट
मुरगूड (प्रतिनिधी)
ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचा वाचन प्रोत्साहन व समृद्ध शालेय ग्रंथालयासाठी सुरू असलेला ग्रंथदान उपक्रम हा आदर्श व अनुकरणीय असून वाचन संस्कृती मजबूत होण्यास हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्य़ातील शाळाशाळांतून प्रत्यक्षात राबवला पाहिजे. त्यासाठी मुख्याध्यापकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. असे आवाहन करून मुख्याध्यापक आणि शिक्षक वाचते झाले तरच विद्यार्थीदशेपासून नव्या वाचकांची पिढी तयार होईल असा आशावाद ज्येष्ठ नेत्या, माजी खासदार निवेदिता माने यांनी व्यक्त केला. त्या काकासाहेब माने हायस्कूल, रुकडी येथे ग्रंथदान समारंभात अध्यक्षपदावरून बोलत होत्या.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचेवतीने समृद्ध शालेय ग्रंथालय आणि वाचन प्रोत्साहनासाठी हातकणंगले तालुक्यातील २५ हायस्कूल्सना प्रत्येकी वीस दर्जेदार व वाचनीय पुस्तकांचा संच , ग्रंथालय शास्त्राचे जनक एस .आर.रंगनाथन यांचा फोटो व रोहन सोशल फाऊंडेशनचे स्मृती चिन्ह भेट देण्यात आले. येथील काकासाहेब माने हायस्कूलने हा ग्रंथ भेट कार्यक्रम नेटकेपणाने, उत्साहात आयोजित केला होता. माजी खासदार डॉ. निवेदिता माने यांचे हस्ते संबंधित हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना पुस्तकसंच देण्यात आले . नूतन खासदार धैर्यशील माने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पुष्पहारांऐवजी पुस्तके देऊनच मान्यवरांचे स्वागत करणेत आले.
सेवानिवृत्त प्राचार्य जीवन साळोखे गेली १८ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यात अखंडपणे ‘आपण सारे वाचूया …वाचन संस्कृती वाढवूया’, हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत, ग्रंथदान उपक्रम स्वखर्चाने निरपेक्षपणे राबवत आहेत. आजपर्यंत त्यांनी सुमारे १५ हजार पुस्तके जिल्ह्यातील अनेक शाळा- वाचनालयांना दान केली आहेत . त्याअंतर्गत हा ग्रंथदान कार्यक्रम येथील बाळासाहेब माने शिक्षण संकुलातील सभागृहात उत्साहात झाला.
प्राचार्य जीवन साळोखे यावेळी बोलताना म्हणाले, “सध्या मोबाईलची समाजात क्रेझ आहे. परिणामी दर्जेदार वाचनाबद्दल घोर अनास्था आणि उपेक्षा होताना आढळते. त्यासाठी शिक्षकांनी स्वतः वाचनात सातत्य ठेवून विद्यार्थ्यांना वाचते करावे. नवीन पिढीत वाचनाची आवड वाढली तरच वाचन संस्कृती वाढेल. त्यासाठीच प्रत्यक्ष कृती हवी.केवळ भाषणबाजी नको. वाचनातून आपले सामान्य जीवन समृद्ध बनते हे विसरू नये. “
यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी गुरुवर्य जीवन साळोखे यांच्या ग्रंथदान उपक्रमाचा मुक्तकंठाने गौरव केला.
रुकडीसह मजले,आळते, हातकणंगले,चंदूर, रुई,साजणी,तीळवणी,माणगाव अतिग्रे, माले,हेरले,मौजे वडगाव येथील शाळांचे मुख्याध्यापक,ग्रंथपाल, शिक्षक व विध्यार्थी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सौ.पद्मजा पाटील यांनी स्वागत केले, संजय वारके यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. विजय शिणगारे यांनी आभार मानले .
यावेळी भरवलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन व ‘लोकसंख्या वाढ व पर्यावरण ‘या भित्तिपत्राचे अनावरण माजी खासदार निवेदिता माने यांचे हस्ते झाले.