महापूरकाळात ग्रामपंचायतीनी आपत्ती व्यवस्थापन करावे: ना. मुश्रीफ
– कागलमध्ये आपत्ती व्यवस्थापन कीटसह घरकुल मंजुरीपत्रांचे वाटप
कागल : प्रतिनिधी
गत दोन- तीन वर्षांपूर्वी कागल तालुक्यात महापुरामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी मोठी वित्तहानी झाली होती. शासनानेही भरीव मदत केली होती. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. अशावेळी आपत्ती काळात पूरग्रस्त गावातील लोकांनी सतर्क राहावे. तसेच; ग्रामपंचायतीने मिळालेल्या आपत्ती व्यवस्थापन कीटचा वापर करून ग्रामस्थांची सुरक्षितता जपावी. असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल पंचायत समितीच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन किट व विविध कामांतर्गत लाभार्थ्यांना लाभ वितरण कार्यक्रमात मंत्री मश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यातील महायुती शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, याशिवाय महिलां आणि गोरगरिबांसाठी विविध सवलतीच्या, लाभांच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. या सर्व योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन करत केंद्र आणि राज्य शासनाने गोरगरिबांना पक्की घरे मिळावीत म्हणून विविध घरकुलांची योजनाही प्रभावीपणे राबविली आहेत. अशी घरकुले म्हणजे मुला बाळांच्या संस्काराची केंद्रे आहेत.
यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते सुळकुड, वंदूर, करनूर, सिध्दनेर्ली, बाणगे, आणुर, नानीबाई चिखली या पूरग्रस्त गावांना आपत्ती व्यवस्थापन किटचे वाटप झाले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत नानीबाई चिखली व कसबा सांगाव या प्रभागातील २० ग्रामसंघांना सीआयएफ वाटप झाले. बँक ऑफ इंडियाच्या बिद्री शाखेकडून आणि बँक ऑफ इंडियाच्या मुरगुड शाखेकडून बचत गटांना दोन कोटींचे कर्जवाटप झाले. महिला बचत गटाच्या सभासदांना वैयक्तिक कर्ज वाटप झाले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून घरकुल लाभार्थ्यांना ताबापट्टी, महिला बालकल्याण विभागाच्यावतीने अंगणवाडी मदतनिसांना नेमणूक आदेश, पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत नियुक्तीपत्रांचे वाटप, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत योजनेत गतिमानता आणण्यासाठी रोजगार सेवकांना टॅब वाटप व सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेशांचे वितरण व क्षय रुग्णांना फूड पॅकेट वाटप झाले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फारूक देसाई, सहाय्यक गट विकास अधिकारी आप्पासाहेब माळी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सौ. सारिका कासोटे, दत्ता पाटील, सतीश घाडगे प्रमुख उपस्थित होते.
सूत्रसंचालन गीतांजली खोत यांनी तर आभार सहाय्य गटविकास अधिकारी आप्पासाहेब माळी यांनी मानले.
…………..