‘ बिद्री ‘ हिताच्या आड येणाऱ्यांना जनता जागा दाखवेल
– बोरवडेत सर्वपक्षीय ऊस उत्पादकांकडून कारवाईचा निषेध
बोरवडे : प्रतिनिधी
बिद्री साखर कारखाना हा सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आहे. कधी काळी ऊसाला पाचशे- सहाशे दर मिळत असताना चेअरमन के. पी. पाटील यांनी सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून ‘ बिद्री ‘ चे नाव देशपातळीवर नेले. कारखान्याला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कार मिळाले. परंतु ही प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खुपत असून ‘ बिद्री ‘ च्या हिताच्या आड येणाऱ्यांना जनताच योग्यवेळी त्यांची जागा दाखवेल, असे मत कागल पंचायत समितीचे माजी सदस्य रघुनाथ कुंभार यांनी व्यक्त केले.
बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पावर केलेल्या कारवाईचा बोरवडे ( ता. कागल ) येथे सर्वपक्षीय ऊस उत्पादक सभासदांकडून निषेध करण्यात आला. यावेळी बोरवडे, बिद्री, उंदरवाडी, फराकटेवाडी या गावांतील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी सोमवारी (१जुलै) कागल तहसीलदार कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात हजारोंच्या उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच विनोद वारके म्हणाले, बिद्रीच्या कारभारावर टीका करणाऱ्यांना सहा महिन्यापूर्वीच सुज्ञ सभासदांनी मतपेटीतून उत्तर दिले आहे. ही कारवाई मागे न घेतल्यास बिद्री परिसरातील शेतकरी रस्त्यावर उतरेल.
माजी उपसरपंच ज्ञानदेव फराकटे यांनी बिद्रीच्या डिस्टलरी प्रकल्पातून सभासदांना अधिक चांगला दर मिळणार आहे. विरोधकांनी हे षडयंत्र रचले असून याचा जाब त्यांना पुढील काळात सभासदांना द्यावाच लागेल.
डॉ. रमेश चौगले, बंडोपंत पाटील, अशोक कांबळे, पांडुरंग खाडे यांची भाषणे झाली. मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपसरपंच विनोद वारके, ज्ञानदेव फराकटे, तानाजी शामराव साठे, सुनील मगदूम, एकनाथ चव्हाण, के. के. फराकटे, संजय पाटील, आनंदा फराकटे, बाळासो ईश्वरा फराकटे, शंकर जोंधळे, पंडीत सुर्यवंशी, राजेंद्र जाधव, भागवत वारके यांच्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, पदाधिकारी उपस्थित होते.
– —